
राज्यासह भंडारा जिल्ह्यात लसीकरण मोहीम सुरु आहे. मात्र, मध्यप्रदेश सीमेवरील भंडारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील ग्रामीण भागात कोरोना लस घेतल्याने मृत्यू होत असल्याच्या गैरसमजातून भयभीत असलेले नागरीक लसीकरण केंद्रांला पाठ दाखवीत असल्याने लसीकरणाला खिळ बसली आहे.
कोरोनामुळे संपूर्ण जग हादरून गेला आहे. यंदा महाराष्ट्रात तर कोरोनाने कहर केला आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट इतकी भयावह आहे की, ऑक्सिजनअभावी अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. या कोरोनाच्या साखळीला तोडण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आला असला तरी, कोरोनाने अक्षरश: थैमान घातला आहे. या कोरोनाला रोखण्यासाठी देशात कोरोना लस दिली जात आहे. लस घेण्यासाठी अनेक जिल्ह्यात नागरिकांनी गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे. तर, भंडारा जिल्ह्यात लसीकरण करण्यासाठी गावोगावी कॅम्प लावण्यात येत आहे. सुरूवातीला नागरिकांनी लसीकरणाला चांगला प्रतिसाद दिला. मात्र, लस घेतल्याने अनेक नागरीक मृत्यू पावत आहेत, अशी अफवा ग्रामीण भागात पसरली असल्याने आता ग्रामीण भागातील नागरीक लसीकरण केंद्रावर जावून लस घेण्यासाठी भित आहे. लोकांनी लसीकरण करावे यासाठी तुमसर तालुक्यातील महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असेलल्या आदिवासी गाव चिखली या गावात नागरीक लस घेण्यास तयार नाही. या गावाची लोकसंख्या २ हजार इतकी आहे, चिखली देवनारा गावात ६ कॅम्प लावण्यात आले मात्र मात्र आतापर्यन्त या गावातील १०८ लोकांनीच लस घेतली आहे. पण आता इतर नागरीक लस घेण्यासाठी तयार नाहीत. त्यासाठी सरपंच, आरोग्य सेविका, यांनी सुद्धा नागरिकांची समज काढली असताना सुद्धा नागरिकांनी लसीकरण केंद्राकडे पाठ फिरवली आहे. हा प्रकार फक्त या आदिवासी गावांचाच नाही तर जिल्ह्यात सगळीकडे अशीच परिस्थिती असल्याचे पाहायला मिळत आहे,
तर जिल्ह्यात आजपर्यंत २ लाख ४९ हजार नागरिकांचा लसीकरण झाले आहे. त्यामुळे नागरीक लसीकरण करण्यासाठी उत्सुक नाही असे या वरुण दिसत आहे. तर नागरिकांनी लस घेण्यासाठी तयार व्हावे म्हणुन ग्रामीणस्तरावर तलाठी, ग्रामसेवक, सामाजिक संस्था यांची टीम तयार करुन नागरिकांना लसी संदर्भात जनजागृती करुन नागरिकांचा गैरसमज दूर केला जात असून नागरिकांनी लस घ्यावी, असे आव्हान जिल्हाधिकारी यांनी केले आहे,