भंडारा : शहरातील प्रसिद्ध श्यामसुंदर लॉनचे मालक तथा प्रॉपर्टी डीलर समिर दास यांची ४ एप्रिलला धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी भंडारा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
समीर बकिमचंद दास (५८) भंडारा असे मृतक प्रॉपर्टी डीलरचे नाव आहे. भंडारा नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील बेला परिसरातील राजीव गांधी नगरात ४ एप्रिलला त्यांचा मृतदेह आढळून आला होता. समिर दास हे प्रॉपर्टी डीलिंगचा व्यवसाय करीत असल्याने त्यांच्याकडे शहरालगत अनेक भूखंड आहेत. ४ एप्रिलला समिर दास हे कुणाला तरी बेला येथील त्यांचा भूखंड दाखविण्यासाठी गेले होते. त्याचवेळी त्यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. दुपार लोटूनही समिर दास हे जेवण करायला घरी गेले नव्हते. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांची सर्वत्र शोधाशोध केली.
बेला येथील राजीव गांधी नगरात दास यांचा मृतदेह आढळून आला होता. भंडाराचे ठाणेदार लोकेश कानसे यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मागील नऊ दिवसांपासून भंडारा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपींच्या मागावर होते. तब्बल नऊ दिवसानंतर या खून प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली.
जमिनीच्या वादातून हत्या!
याप्रकरणी भंडारा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बारीकसारीक माहिती गोळा करून चौकशी सुरू केली. त्यात त्यांना सदर हत्या जमिनीच्या वादातून झाल्याची माहिती मिळाली. त्या आधारे रविवारला दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून आज सोमवारी या प्रकरणातील आणखी एकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. या तिघांमध्ये भंडारा येथील एक, तुमसर येथील एक आणि अन्य अशा तिघांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचा संपूर्ण तपास पूर्ण व्हायचा असून हत्या नेमकी कशासाठी केली, हे पूर्णपणे स्पष्ट झाले नसल्याचे कारण पुढे करून पोलिस निरीक्षक लोकेश कानसे यांनी अटक केलेल्यांची नावे देण्यास असमर्थता व्यक्त केली.