बुलंद आवाज न्यूज नेटवर्क

शेतकऱ्यांचा संतप्त सवाल : लॉकडाऊनमुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल
तुमसर : कोरोनाचा प्रकोप दिवसागणिक वाढत चालला आहे त्याला नियंत्रीत करण्यासाठी राज्य शासनाने १५ एप्रिल पासून खडक लोक डाऊन घोषित केला आहे. यात भाजीपाला पिकाला अत्यावश्यक सेवेत सूट देण्यात आली आहे. असे असले तरी तुमसर तालुक्यात मात्र स्थानिक प्रशासनाने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण केले आहे. भाजीपाला मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. परिणामी शेतातील भाजीपाला सडायला लागल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे.
तुमसर तालुक्यातील सिहोरा, बपेरा, चुल्हाड यासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेतीसह भाजीपाला पिकांची लागवड करणारा शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. याहीवर्षी येथील शेतकऱ्यांनी विविध प्रकारचे भाजीपाला उत्पादन घेतले आहे. उन्हाळ्यात या भाजीपाल्याची विक्री करून आर्थिक मदत होईल, अशी अपेक्षा शेतकरी बांधवांना होती. मात्र, कोरोनाने मोठ्या प्रमाणात डोकेवर काढले आहे. अनेकांना यामुळे आपले जीव गमवावे लागले आहेत. तर, अनेकांवर रुग्णालयात औषधोपचार सुरू आहे.
कोरोना नियंत्रणात यावा यासाठी राज्य सरकारने १५ एप्रिल पासून पुढील १५ दिवस राज्यात कडक लॉकडाऊन घोषित केले आहे. मात्र, यातून गोरगरीब जनतेला आणि छोट्या मोठ्या व्यावसायिकांना फटका बसणार नाही, याची काळजी राज्य सरकारने घेतली आहे. सोबतच अत्यावश्यक सुविधेत भाजीपाला व्यवसायिकांना सूट देण्यात आली आहे. त्यामुळे बाजारपेठा जरी बंद असल्या तरी भाजी मार्केट बंद ठेवण्याचे निर्देश राज्य सरकारने दिलेले नाही. असे असतानाही, तुमसर तालुक्याच्या स्थानिक प्रशासनाने २३ एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन घोषित केला आहे. यामुळे केवळ दवाखाने आणि औषधालय सुरू ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतल्याने भाजी उत्पादक शेतकरी मोठ्या विवंचनेत सापडला आहे.


दहा दिवसात भाजीपाला खराब होईल
अंगमेहनत करून शेतात भाजीपाला उत्पादन घेतले. मात्र, तुमसर तालुका प्रशासनाने घेतलेल्या तुघलकी निर्णय यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांसमोर मोठा आर्थिक पेच निर्माण झाला आहे. २३ तारखेपर्यंत बाजारपेठा बंद असल्याने उत्पादित भाजीपाला विकायचा कसा असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. या दहा दिवसात शेतातील भाजीपाल्याची विक्री झाली नाही तर, तो पूर्णपणे सडणार. अशा परिस्थितीमुळे शेतकर्‍यांवर पुन्हा एकदा आर्थिक संकट घोंगावणार आहे.


भाजी मार्केट सुरू करण्याची मागणी
शेतकऱ्यांच्या शेतातील भाजीपाल्याची विक्री करण्यासाठी भाजी मार्केट सुरू करण्याची मुभा स्थानिक प्रशासनाने द्यावी, अशी मागणी आता शेतकरी वर्गाकडून होत आहे. मार्केट बंद ठेवण्यात आले असल्याने भाजीपाला विकायचा कसा आणि कुठे? असा प्रश्न भाजीपाला उत्पादकांसमोर निर्माण झाला आहे. जर हा भाजीपाला वेळेत विकला नाही तर तो शेतातच खराब होईल, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने भाजी मार्केट सुरू करून भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांवर ओढवलेले संकट तातडीने दूर करण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी होत आहे.

Bulandaawaj
Author: Bulandaawaj

Leave a Reply

Your email address will not be published.