विभागीय आयुक्तांचा आदेश : एसडीएम यांचा आदेश कायद्यातील दृष्टीकोनातून योग्य नसल्याचा ठपका


भंडारा : दोन प्रकरण पोलीस तपासात तर, एक प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना दुसरे कुठलेही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल नाही. असे असतानाही भंडारा पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावावर भंडाऱ्याचे उपविभागीय दंडाधिकारी यांनी दिलीप देशमुख यांना जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार (तडीपार) करण्याचा आदेश बजावला होता. या आदेशाविरुद्ध देशमुख यांनी नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ संजीवकुमार यांच्याकडे दाद मागितली होती. एसडीएम यांनी बजावलेला आदेश कायद्यातील दृष्टीकोनातून योग्य नसल्याचा ठपका ठेवत विभागीय आयुक्तांनी देशमुख यांच्या तडीपारीचा आदेश रद्द केला आहे.
भंडारा शहरातील शुक्रवारी येथील प्रतिष्ठित पत्रकार तथा व्यवसायाने प्रॉपर्टी खरेदी विक्रीचा व्यवसाय करणारे दिलीप देशमुख यांच्याविरुद्ध भंडारा पोलीस निरीक्षक यांचे प्रस्तावानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेमार्फत भंडारा उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे हद्दपारीचा प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार उपविभागीय अधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५६(१)(अ) अन्वय मार्च २०२१ रोजी सहा महिन्यासाठी भंडारा जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश बजावला होता. या आदेशाविरुद्ध दिलीप देशमुख यांनी नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ संजीवकुमार यांच्याकडे सदर आदेश रद्द करण्यासाठी दाद मागितली होती. विभागीय आयुक्त यांनी, अपिलार्थी दिलीप देशमुख यांचे वकील ॲड पराते यांनी केलेला युक्तिवाद तसेच भंडारा उपविभागीय दंडाधिकारी व भंडारा पोलीस स्टेशन यांनी दाखल केलेला मूळ अभिलेख त्यांची सखोल तपासणी केल्यानंतर ४ जूनला सदर तडीपार करण्याचा आदेश रद्द केला आहे.

आयुक्त संजीवकुमार यांचा आदेश
दिलीप देशमुख यांच्या विरुद्ध मोहाडी व भंडारा पोलीस स्टेशन येथे सन २०१९ मध्ये तीन गुन्हे दाखल असून प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आलेली आहे. अपिलार्थी दिलीप देशमुख विरुद्ध गंभीर अथवा ज्यामुळे नागरिकांच्या व साक्षीदाराचे मनात भीती निर्माण होते असा कोणताही गुन्हा दाखल नाही. या बाबीकडे प्रतिवादी उपविभागीय अधिकारी यांनी दुर्लक्ष केले आहे. प्रतिवादी उपविभागीय दंडाधिकारी भंडारा यांनी पारित केलेला आदेश कायद्यातील दृष्टिकोनातून योग्य नाही. देशमुख यांच्यावर दाखल गुन्हे दीर्घ कालावधीचे आहे. त्यातही दोन गुन्हे पोलीस तपासावर असल्यामुळे फक्त एका गुन्ह्याच्या आधारावर हद्दपारीची कारवाई करणे योग्य नाही. त्यामुळे अपीलार्थी दिलीप देशमुख यांचा अपील अर्ज मंजूर (मान्य) करण्यात येत आहे. यासोबतच उपविभागीय दंडाधिकारी भंडारा यांचे आदेश दि. १५ मार्च २०२१ रद्द करण्यात येत असल्याचा आदेश बजावला आहे.


ऍड पराते यांनी मांडली बाजू
अपीलार्थी दिलीप देशमुख यांच्यावर तीन गुन्हे दाखल असले तरी दोन पोलीस तपासात आहे. तर, तर एक गुन्हा न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे हद्दपारीची कारवाई करता येत नाही. अपिलाअर्थी देशमुख यांचे विरुद्ध हद्दपार आदेश पारित करताना सद्सद्विवेकबुद्धीचा वापर केला नाही. सदर तिन्ही गुन्हे २०१९ मधील दीर्घ कालावधी झालेला असल्यामुळे अपीलार्थी यांच्याविरुद्ध केलेला आदेश योग्य नाही. चांगल्या वर्तणुकीबाबतचे बंधपत्र भरून घेतल्यानंतर देशमुख यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. तसेच देशमुख यांचेविरुद्ध कोणताही गंभीर अथवा ज्यामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण व्हावा, असा गुन्हा दाखल नाही. त्यामुळे हद्दपारीचे आदेश न्यायसंगत नसल्याने रद्दबादल करण्याची विनंती केली होती.
मानहानीचा ठोकणार दावा
गंभीर स्वरूपाचे गुन्हे नसतानाही माझ्यावर जाणून-बुजून तडीपारीची कारवाई करण्यात आले. तसे वृत्त वर्तमानपत्र तथा पोर्टलला माझ्या छायाचित्रासह प्रकाशित करण्यात आले. यात मला गंभीर स्वरूपाचा गुन्हेगार असल्याचे समाजासमोर दाखविण्यात आले. यात माझी समाजातील प्रतिष्ठा मलीन करण्याचा डाव रचण्यात आला. यात माझी व माझ्या कुटुंबाची बदनामी व मानहानी झाली आहे. या प्रकरणी मी पोलीस, प्रशासकीय अधिकारी आणि वृत्त प्रकाशित करणाऱ्या सर्वांविरुद्ध लवकरच मानहानीचा दावा दाखल करीत आहे .दिलीप देशमुख, भंडारा

Bulandaawaj
Author: Bulandaawaj

Leave a Reply

Your email address will not be published.