
भंडारा, :- कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून उपचारासाठी खाटांची संख्या कमी पडत आहे. ही बाब लक्षात घेता आरोग्य यंत्रणा अपग्रेड करण्यासोबतच कोविड रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविण्याच्या सूचना अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोविड 19 आढावा बैठकीत बेड उपलब्धता, आरोग्य सुविधा, कोविड केअर सेंटर, लसीकरण, लस उपलब्धता, रेमडेसिव्हीर, ऑक्सिजन उपलब्धता व रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधा याबाबतचा आढावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सर्वश्री आमदार अभिजीत वंजारी, नरेंद्र भोंडेकर, राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी संदीप कदम, अतिरिक्त पोलीस अधिक्षक अनिकेत भारती, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, माजी मंत्री नाना पंचबुद्धे, धनंजय दलाल व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
भंडारा सामान्य रुग्णालयात प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्याचप्रमाणे उपजिल्हा रुग्णालय तुमसर, साकोली व पवनी याठिकाणी प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्यात यावा अशा सूचना त्यांनी केल्या. भंडारा येथे जास्त क्षमतेचा प्रकल्प असावा अशी मागणी यावेळी लोकप्रतिनिधींनी केली. तसा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात यावा असे त्यांनी सांगितले.
रेमडेसिव्हीरचे हजार डोजेस जिल्ह्यात उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. रुग्णालयाची बेड क्षमता वाढविण्यावर भर देण्यात यावा तसेच ज्या रुग्णालयामध्ये स्टाफची कमतरता आहे त्या ठिकाणी प्रायव्हेट हॉस्पिटल व डॉक्टरची मदत घेण्यात यावी. प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये बेडच्या उपलब्धतेबाबत विशेष लक्ष देण्यात यावे. ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी जनरेशन प्लॉन्ट तयार करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या. डॉक्टर व नर्सेसची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी असे निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले. कोविड रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभ देण्यात यावा असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी त्यांनी कोविड लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला. जिल्ह्याला 2 लाख 350 डोस प्राप्त झाले असून 1 लक्ष 68 हजार 504 लोकांचे लसीकरण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिली. लसीकरणात भंडारा जिल्हा पहिला असल्याचे त्यांनी नमूद केले. यावर नवाब मलिक यांनी जिल्हा व आरोग्य प्रशासनाचे अभिनंदन केले.