
आज सकाळी अड्याळ ते किटाडी मार्गावरील झुडूपालगत अस्वलीचे दर्शन झाले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. याची माहिती गावातील नागरिकांनी अड्याळ वन विभागाला दिली.
उपवनसंरक्षक एस. बी. भलावी यांच्या मार्गदर्शनात अड्याळचे वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम ठोंबरे घटनास्थळी पोहोचले. यानंतर भंडाराचे वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक राजूरकर, आर आर यू पथकाचे अनिल शेळके व अन्य वनकर्मचारी अस्वल असलेल्या घटनास्थळी पोहोचले. यावेळी अस्वल झुडूपामध्ये दबा धरून बसली होती. वन कर्मचाऱ्यांनी मोठ्या शिताफीने रेस्क्यू करून तिला सुखरूपरित्या गावातून जंगलाच्या दिशेने हुसकावून लावले. सुमारे पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर अस्वलीचे रेस्क्यू करण्यात आले. दरम्यान, तिला बघण्यासाठी घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. कुठलीही अघटित घटना होऊ नये म्हणून अड्याळ पोलिस व वनविभागाचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते.